पंढरपूर : वारकरी, भाविकांना आषाढी यात्रेचे वेध लागले आहेत. प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. आषाढी यात्रा शुद्ध एकादशीदिवशी सहा जुलैला साजरी होत आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाच्या वारकर्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा केली जाते. या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस यांना मंगळवारी (दि. 17) मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन दिल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), अॅड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते वीणा, वारकरी पटका, ‘श्रीं’ची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल-रुक्मिणीमातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या द़ृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मागील वर्षीच्या आषाढी यात्रेची पूर्वतयारी पाहणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पाहणी केल्यानंतर भाविकांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यावर्षी मुख्यमंत्री फडणवीस यात्रा पूर्वतयारीची पाहणी करणार का, याकडे वारकरी, भाविकांचे लक्ष लागले आहे.