पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी बुंदी लाडू प्रसाद तयार करताना कर्मचारी. Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari | आषाढी यात्रेत 13 लाख 50 हजार बुंदीलाडू प्रसाद

60 हजार राजगिरा लाडू; सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढ शद्ध एकादशीला म्हणजे दि. 6 जुलै रोजी आषाढी यात्रा होत आहे. या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून, भाविकांची दर्शनरांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत यात्रेत 13 लाख 50 हजार बुंदी व 60 हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो. मंदिर समितीच्या बुंदीलाडू प्रसादाला भाविकांतून मोठी मागणी होत असते. या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल, याद़ृष्टीने 13 लक्ष 50 हजार बुंदीलाडू प्रसाद व 60 हजार राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे.

यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकीट 20 रुपयांप्रमाणे व 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू पॅकिंग करून प्रति पाकीट 10 रुपयाप्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पश्चिमद्वार, उत्तरद्वार, श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल असून, सर्व स्टॉल 24 तास खुले ठेवण्यात येत आहेत. बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे.

बुंदीलाडू प्रसाद एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणा, विलायची इत्यादी पदार्थांपासून तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत आहे.
- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
बुंदी लाडू तयार करण्यासाठी सुमारे 120 कर्मचारी 24 तास परिश्रम घेत आहेत. भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करतांना आरोग्याच्या द़ृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत. प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवीचा वापर करण्यात येत आहे.
- मनोज श्रोत्री, व्यवस्थापक मंदिर समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT