सोलापूर

आषाढी एकादशी विशेष : आनंदसोहळा

दिनेश चोरगे

आषाढी वारीत वारकरी ऊन, पाऊस याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. त्याला भेटायचे असते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली. वारी हा एक आनंदसोहळा असतो, वारीत काही वारकरी दिवसभर पाणीही पित नाहीत. काय खायचे-प्यायचे ते रात्री तळावरच. काही वारकरी वारीत अनवाणी चालतात, तर काही एकच वेळ जेवण करून चालतात. संपूर्ण वारी सोहळ्यात एकच जरीपटका असतो, असे सर्वश्रुत आहे. पण वास्तवात वारीच्या व्यवस्थेच्या द़ृष्टीने एकूण तीन जरीपटके असतात. निष्काम सेवेचा धडा मिळतो या वारीतच! त्याविषयी…

संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीच फक्त दोनच ठिकाणी आरती होते. प्रथम – थोरल्या पादुका (चर्‍होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी. श्रीमंत शिंदे सरकार यांनी माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज गावे इनाम दिली होती. हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार होते. माऊलींच्या मंदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप श्रीमंत शिंदे सरकार यांनी बांधले. याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधी स्थळ असलेल्या शिंदे छत्रीजवळ सकाळची आरती होते.

वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी; दुपारी जेवणानंतर हरिपाठ, गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एकावेळी एकच अभंग ऐकू येतो. दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगातील शेवटचे चरण 'ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान। समाधी संजीवन हरिपाठ॥' हे म्हटले जाते. त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.

रथापुढील दिंड्या माऊली चालायला लागली की चालू लागतात. माऊली विसाव्याला किंवा तळावर थांबल्यावर दिंड्या विसावतात. विसाव्याच्या जागी अगोदर पोहोचूनही माऊली विसावत नाही तोवर या दिंड्याही विसावत नाहीत. माऊलींचे धाकटे बंधू सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी टप्पा येथे येऊन माऊलीस भेटते. यालाच बंधुभेट म्हणतात. हा भावुक प्रसंग असतो. दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात. मानकरी व विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात.

वेळापूर येथे भारुडाचा मान शेडगे दिंडीकर्‍यांना आहे. शिक्षणापासून वंचित तत्कालीन बहुजन समाजाला आध्यात्मिक ज्ञानदानाचा श्री एकनाथ महाराजांचा उद्देश त्यांच्या भारुडातून साकारतो. संपूर्ण सोहळ्यात श्रींची चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी, परतीवेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.

वारी सोहळ्यातील मोठे आकर्षण म्हणजे रिंगण. 1) उभे रिंगण, 2) गोल रिंगण. सोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या, तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन जेवणानंतर होतात. रिंगण सोहळ्यानंतर उडीचा कार्यक्रम अवर्णनीय असतो.

पालखी सोहळा प्रत्येक गावातून जात असताना त्या गावातील प्रत्येकाच्या मनात ज्ञानेश्वर माऊली आपल्या गावात, आपल्या दारात येते, अशी भावना व श्रद्धा असते. 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' आपल्या गावात संतांच्या रूपाने आलेल्या लाखो वारकर्‍यांच्या स्वागताला व आदरातिथ्याला प्रत्येक जण आसुसलेला असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे वारकर्‍यांना अन्नदान करण्याचा प्रयत्न करतो. या पंढरीच्या वाटेने नुसते ज्ञानोबा, तुकाराम म्हटले तरी कोणी उपाशी राहत नाही.

सोहळ्यात होणारा ज्ञानोबा-तुकाराम गजर याला साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास, तर दुसरा उच्छ्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामांत माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यान संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT