Ashadhi Wari 
सोलापूर

Ashadhi Wari: वारकऱ्यांना रेकॉर्डब्रेक सुविधा

'फूट मसाजर' सुविधा पाच पटीने तर स्नानगृहांची संख्या सहा पटीने वाढवली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आषाढी एकादशी महासोहळ्यासाठी पंढरपूरकडे कूच करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे.

यंदाची वारी अधिक सुकर आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुविधांमध्ये दुप्पट ते पाच पटीने वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा ग्रामविकास मंत्रालयामार्फत वारकऱ्यांसाठी तब्बल ५० हजार रेनकोटचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.​ देहू आणि आळंदी येथून निघालेल्या पालख्यांच्या मार्गावर वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर्स, पाण्याचे टँकर्स, स्वच्छतागृह आणि स्नानगृहांची उभारणी पूर्ण झाली असून, प्रशासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सुविधांचा 'यंदा' महापूर

मागील वर्षापेक्षा मोठी वाढ​प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांचा प्रवासातील थकवा दूर करण्यासाठी गेल्या वर्षी सुरू केलेल्या 'फूट मसाजर' सुविधेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदा ही संख्या पाच पटीने वाढवण्यात आली आहे. तसेच महिला व पुरुष वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्नानगृहांची संख्या तब्बल सहा पटीने वाढवण्यात आली आहे. इतर सर्व मूलभूत सुविधांमध्येही यंदा किमान दोन ते तीन पटीने वाढ करण्यात आली आहे.

स्वच्छतेसाठी 'प्रोफेशनल एजन्सी'

५००० फिरती शौचालये ​पंढरपूर, वाळवंट परिसर, ६५ एकर क्षेत्र आणि संपूर्ण पालखी मार्गावर चोख स्वच्छतेसाठी यंदा एका व्यावसायिक एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीचे तब्बल ८०० स्वच्छता दूत पालखी सोबतीला आणि मुख्य मुक्कामाच्या ठिकाणी तैनात राहतील. उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा परिषदेने ५,००० मोबाईल टॉयलेट्स (फिरती शौचालये) उपलब्ध करून दिली आहेत.

​२२५ पाण्याचे टँकर्स

वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावर २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंदा 'आरोग्य दूतांची' संख्या दुप्पट करण्यात आली असून, औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.​जर्मन हँगर्सचा विस्तार आता

१२ लाख स्क्वेअर फुटांवर!​पावसापासून वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून उभारण्यात येणाऱ्या जर्मन हँगर्सच्या क्षेत्रफळात यंदा प्रचंड वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा मिळून ५ लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात जर्मन हँगर्स होते, यंदा हा आकडा थेट १२ लाख स्क्वेअर फूट इतका करण्यात आला आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित निवारा मिळणार आहे.​

बीडीओ डेप्युटेशनवर येणार

प्रशासकीय बळकटीकरण​वारीचे नियोजन आणि संनियंत्रण चोख व्हावे यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे ६ बीडीओ (गट विकास अधिकारी) डेप्युटेशनवर देण्याची मागणी केली आहे. अधिकारी वारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर समन्वयाचे काम पाहतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT