पंढरपूर : 'जाता पंढरीशी सुख लागे जीवा' या संतोक्तीनुसार लाखो भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त हजेरी लावली आहे. आषाढी एकादशीचा सोहळा शनिवारी (दि. २५) भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. संतांच्या पालख्या रात्री पंढरपूर येथे दाखल झाल्या आहेत. सुमारे २५ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. यामुळे पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे. पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने हाेताच पावसानेही चांगली हजेरी लावली. राज्य, परराज्यांतून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरीत भाविकांचा महासागर उसळला आहे.
पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरीता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. साडेपाच हजार जादा बसेस आषाढीकरीता सोडल्या आहेत. जादा रेल्वे गाड्यादेखील धावत आहेत. खासगी वाहनानेदेखील भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. १८ ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे.
दशमीदिवशी चंद्रभागा नदीचे वाळवंट, भक्तीसागर ६५ एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर १५ किमी पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत चार लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. ६५ एकर भक्तीसागरात सहा लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तंबू, राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.
यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शन रांग १५ किमी अंतरावर पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान १८ तासांचा कालावधी लागत आहे. एका मिनिटाला साधारणपणे ४० भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. आणखी दर्शन रांग पुढे पुढे सरकत चालली आहे. दर्शन रांगेत 20 दर्शन शेड उभारले आहेत. मुख दर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुती ते पुढे गोपाळपूर रोडकडे मुख दर्शन रांग पोहोचली आहे. मुख दर्शनासाठीदेखील किमान ५ तासाचा कालावधी लागत आहे. व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आल्याने दर्शन रांग लांबल्याचे चित्र दिसत आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरांतील मठ, मंदिर, भक्त निवास हाऊस फुल्ल झाली आहेत. मठ, मंदिरातून भाविक भजन, कीर्तन करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यात्रेपूर्वी चंद्रभागा नदीत मुबलक पाणी सोडण्यात आले होते. यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे, तर या ठिकाणी अनूचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. दोनशे होडी तैनात करण्यात आल्या आहेत. दहा हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, तर ३५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर भाविकांवर आहे. तसेच मुख्यमंत्री सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांत भाविकांसाठी राहण्यासाठी निवारा, फूट मसाज, आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
पंढरपूर नगरपालिका, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्या वतीने आरोग्य विषयक सेवा बजावण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर दर्शन रांग येथे आरोग्य, तर ६५ एकर येथे महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
येथेही लाखो भाविक औषधोपचाराचा लाभ घेत आहेत. ६ हजार ८१३ शौचालये, महिला स्नानगृह चार ठिकाणी उभारण्यात आली आहेत. चंद्रभागा स्नान करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीकडे येणार्या भाविकांमध्ये विठुमाऊलीच्या नामाचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे वारकर्यांमध्ये उत्साह, नवचैतन्य संचारले आहे.