सोलापूर : महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील रुग्ण पळवापळवी प्रकरणात हात असलेल्या नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होम या हॉस्पिटलची महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांनी गुरुवारी (दि. 31) पुन्हा तपासणी केली. या तपासणीमध्ये धक्कादायक बाबी आढळून आल्या.
हॉस्पिटलच्या नर्सिंग ओपीडी रजिस्टरमध्ये महापालिकेच्या आशा वर्करांना दोनशेपासून दोन हजार रुपयांपर्यंतचा कट (रक्कम) दिल्याची धक्कादायक नोंदी आढळल्या. यामुळे ओपीडी रजिस्टरसह सर्व कागदपत्रे आरोग्य अधिकार्यांनी जप्त केली आहेत. यामध्ये नव्याने 26 आशा वर्करची नावे पुढे आली आहेत. शहरात अशा प्रकारचे मोठे रॉकेट असण्याची शक्यता महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्ण पळवापळवी प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर याप्रकारणात नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलचे सुमित आणि श्रद्धा सुरवसे यांनी हा गोरख धंदा सुरू केल्याचे तपासणीत उघड झाले. गुरुवारी (दि. 31) आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. रेखा माने यांनी पुन्हा हॉस्पिटलची तपासणी केली. हॉस्पिटलचे ओपीडी रजिस्टर तपासले असता त्यातून धक्कादायक अनेक बाबी निदर्शनास आल्या. या प्रकरणात हात असलेल्या नव्याने 26 आशा वर्करची नावे उघड झाली आहेत.
या आशा वर्करांनी पेशंट पाठवल्याच्या मोबदला म्हणून त्यांना दिलेल्या पैशाच्या नोंदी श्रेयस हॉस्पिटलच्या रजिस्टरमध्ये आढळून आल्या आहेत. त्यामध्ये दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयापर्यंची रक्कम दिली गेली आहे. श्रेयस हॉस्पिटलच्या ओपीडी रजिस्टरमध्ये रुग्णाचे नाव, उपचारावर झालेला खर्च, रुग्ण ज्या आशा वर्करने पाठवले तिचे नाव, तिला पैसे दिल्याची नोंदी या रजिस्टरमध्ये आहेत. रजिस्टरसह सर्व कागदपत्रे आरोग्य अधिकार्यांनी जप्त केली आहेत. हॉस्पिटलच्या तपासणीमध्ये देखील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दरम्यान, मुंबई नर्सिंग अॅक्ट आणि पीसीपीएनडीटीएक्स कायदा धाब्यावर बसवत हे श्रेयस हॉस्पिटल चालवले जात असल्याचे तपासणीमध्ये उघड झाले आहे.
श्रेयस हॉस्पिटलची पुन्हा तपासणी करत कागदपत्र जप्त केली आहे. त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. सर्व कायदे धाब्यावर बसत हे हॉस्पिटल सुरू आहे. ओपीडी रजिस्टरमध्ये नव्याने 26 आशा वर्करची नावे आढळून आली आहेत. त्यांना पैसे दिल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत. या सर्व प्रकरणाचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.- डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका