सोलापूर

‘आर्यन्स’ सोलापुरात करणार 800 कोटींची गुंतवणूक!

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत पुण्यातील प्रसिद्ध आर्यन्स कंपनी सोलापुरात पहिल्या वर्षी 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, आयटी कंपनीसह रोबोट बनविण्याचा कारखाना उभारणार आहे. यातून पहिल्या वर्षी 3 हजार व नंतरच्या काळात 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कारखान्याचे भूमिपूजन दोन ऑगस्टला होणार आहे. कामाला सहा महिन्यांत सुरुवात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी महापौर महेश कोठे आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.ए. मनोहर जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कंपनी व कारखाना उभारण्यासाठी चिंचोळी एमआयडीसीत सध्या शिल्लक असलेल्या 100 एकरची जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय डोणगाव रोड येथील कोठे परिवाराच्या जागेचाही पर्याय आहे. या दोन्हींपैकी एका ठिकाणी दोन्ही प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मला याकामी मदत लाभली. त्यांच्यामुळे आर्यन्स कंपनी व रोबोटचा कारखाना सोलापुरात येत आहे. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन दोन ऑगस्टला शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे कोठे यांनी सांगितले.

सिंगापूरच्या धर्तीवर बांधकाम

आयटी प्रकल्प सोलापुरात उभा करण्यासाठी सिंगापूरच्या धर्तीवर ब्लॉक पद्धतीने जलद बांधकाम करण्यात येणार आहे. तीन ते सहा महिन्यांत पहिल्या इमारतीचे काम पूर्ण करून कंपनीचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने अनेक इमारती तयार करून व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. रोबोटबरोबरच सेमी कंडक्टर, भारतीय बनावटीचे सर्च इंजीन, ई-व्हेईकल कारखाना आदी प्रकल्पदेखील सोलापुरात आणण्याचे प्रयत्न आहेत. सोलापूरच्या भौगोलिक व अन्य गोष्टींचा अभ्यास करूनच हे प्रकल्प येथे आणण्यात येत आहेत, असेही मनोहर जगताप यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला कंपनीचे संचालक संजय शेंडगे, किरण लोहार, प्रथमेश कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, कुमुद अंकारम, विद्या लोलगे, शशिकांत केंची आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT