सोलापूर : विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन पक्षाचा आदेश मोडल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या बैठकीत जेथे पक्षाचा उमेदवार नसेल तेथे महाविकास आघाडीतील पक्षाच्या उमेदवाराचे काम करण्याचे ठरले होते. तसे आदेश पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी आदेश दिले होते. तरीही गृहमंत्री शिंदे, खा. शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. आघाडी धर्म मोडल्याने शिंदे पिता-पुत्रीवर कारवाई करावे, यासाठी जिल्हाध्यक्ष मोहिते-पाटील यांनी तक्रार राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली आहे. निवडणुकीत माळशिरस येथे भाजपच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष मोहिते-पाटील यांना पदावर काढून टाका, अशी तक्रार काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती. मात्र, त्याअगोदरच जिल्हाध्यक्ष मोहिते-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. वरिष्ठांचा मनमानी कारभार थांबविल्यास पुन्हा सक्रीय होणार असल्याचे संकेत दिले.
पक्षाने आदेश देऊन ही शिंदे पिता-पुत्रींनी विधानसभेत अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हे शिंदे कि राहुल गांधी यांचे आहे, हेच कळत नाही. पक्षाने दिलेले आदेश डावलून काम केल्याने त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. राजीनामा दिला आहे. मात्र तो अद्यापही मंजूर केला नाही. पक्षाने आदेश दिल्यास पुन्हा सक्रीय होणार आहे. मी कोणत्याही पक्षाच्या संर्पकात नाही.- धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस