सोलापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज शुक्रवारपासून (दि.20) सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील 64 हजार 454 विद्यार्थी 189 परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत.
शुक्रवार (दि.20) फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता 10 वीची परीक्षा होणार आहे. दहावीसाठी 15 परीरक्षक केंद्र असून एकुण 189 परीक्षा केंद्रामधुन 64 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावे, यासाठी शिक्षण, जिल्हा परिषद, महसूल, पोलीस प्रशासन समन्वयातून काम करत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय सात भरारी पथक तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेला विभाग स्तरावर तीन भरारी पथके कार्यरत आहेत. त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध राहतील व सदर चित्रीकरणाची साठवणूक करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व अतिसंवेदनशील व संवेदनशील केंद्रांची संवेदनशील केंद्राची माहिती घेवून याबाबत पोलीस प्रशसनाच्या मदतीने कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.