सोलापूर : चारचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या एमएच-13 इएक्स मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासोबतच दुचाकी वाहनांसाठीही आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांना हवा असणारा पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी विहीत शुल्क भरून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
16 ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, आधार लिंक झालेला मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, पॅनकार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य आहेत.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 16 ऑक्टोबर रोजी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल. यादीतील अर्जदारांनी 17 ऑक्टोबर 2025 रोजी सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा डीडी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रक्कमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरीत केला जाईल.
मालिकेचे वेळापत्रक :
16 ऑक्टोबर - तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती. सायंकाळी पाच वाजता डबल आलेल्या अर्जांची यादी जाहीर. 17 ऑक्टोबर - दुपारी दोनपर्यंत लिलावासाठीचे डीडी सीलबंद लिफाफ्यात स्वीकृती. चार वाजता लिलाव प्रक्रिया.