Arrest Pudhari
सोलापूर

Balraje Aware Patil arrest: अंजनगाव प्रकरणी बाळराजे आवारे पाटील यांना अटक

दंगल व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

माढा : माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीररीत्या उभारण्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून बाळराजे आवारे पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना माढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. लंबे यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

अंजनगाव येथे १ एप्रिल रोजी खेलोबा देवस्थानच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या ठिकाणावरून गावात दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. घटनेनंतर चार दिवसांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थीने हा पुतळा त्या ठिकाणावरून हलवून अन्य शासकीय जागेत स्थलांतरित करण्यात आला.

पुतळा उभारल्यानंतर एका समाजाने तो देवस्थानच्या जागेत असल्याचा आक्षेप घेत रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने पुतळा हटविण्याच्या हालचाली सुरू केल्या. याला विरोध करत पुतळा समर्थकांनी घोषणाबाजी केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पुतळा तत्काळ न हलवण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पुढील दिवशी बाळराजे आवारे पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधला; मात्र त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला.

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही घटनास्थळी येऊन पुतळा हटविल्याशिवाय न हटण्याची भूमिका घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी बाळराजे आवारे पाटील यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा तसेच बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडवणे यासह एकूण नऊ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींवर विविध गुन्हे नोंदवले असून, यामागील सूत्रधार आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्यांची ओळख पटवण्यात आल्याचे सांगितले. संबंधितांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आवारे पाटील यांची बाजू अॅड. शंकर कदम व अॅड. अमोल कोल्हे यांनी न्यायालयात मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT