सोलापूर : करमाळा तालुक्यातील जिंती या गावातील महादेव मंदिराच्या मुख्य सभा मंडपातील उजव्या बाजूच्या खांबावर प्राचीन शिलालेख आढळला. यादव सत्ताकाळातील हा शिलालेख असून शिव पिंडीविषयी त्यावर मजकूर असल्याचे इतिहासतज्ज्ञ नितीन आणवेकर यांनी सांगितले. जिंतीतील मंदिरात ऐतिहासिक सर्वेक्षण करण्यासाठी इतिहासतज्ज्ञ आणवेकर गेले होते. त्यावेळी तेथील महादेव मंदिरात दोन शिवलिंग असल्याचे दिसताच त्यांनी मंदिराचे सुक्ष्म पद्धतीने निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या मुख्य सभामंडपातील उजव्या बाजूच्या खांबावर शिलालेख असल्याचे आढळून आले.
स्तंभावरील शिलालेख आठ ओळींचा असून देवनागरी लिपीत कोरलेले आहे. त्याच्या खालील बाजूस दंडवत शिल्प दिसून आले. शिलालेखावरील अक्षरे पुसट झाली आहेत. त्यातून स्थानिकांनी रंगरंगोटी केल्यामुळे शिलालेखातील अक्षरे अधिकच पुसट झाली. त्यामुळे इतिहासतज्ज्ञ अणवेकर यांनी अधिक अभ्यासासाठी त्या शिलालेखाचे ठसे घेतले.
काय आहे शिलालेखात
शालिवाहन शकाच्या 1316 भाव संवत्सरात अश्विन वद्य 10 म्हणजेच 19 ऑक्टोबर 1316 सोमवार या दिवशी पोम सेठी यांनी आपल्या ज्ञातीच्या व्यापारी संघाच्या कार्यासाठी शिवाची पिंड तयार केली. त्या शिवलिंगाची विधिवत पूजा करून अभिषेक केला. त्या कार्याची आठवण म्हणून हा शिलालेख कोरला आहे. नेहमीप्रमाणे शुभारंभी ‘स्वस्ति श्री’ असा शुभसूचक शब्दप्रयोग शिलालेखामध्ये आहे. हा शिलालेख उत्तर यादव काळातील आहे. शिलालेखाचे वाचन करण्यासाठी अनिल दुधाणे व अर्थव पिंगळे यांनी सहकार्य केल्याचे इतिहासतज्ज्ञ अणवेकर यांनी सांगितले.
यादव काळात शिवालये आणि शिव पिंडीची व्यवस्था केल्याचा उल्लेख करणारे जे शिलालेख आढळतात, त्याच प्रकारातील जिंतीचा शिलालेख आहे. बहमनी सल्तनतीच्या काळातील हा वैशिष्ट्यपूर्ण शिलालेख आहे. मंदिरांतील व्यवस्थेची पद्धत यादव काळानंतरही तशीच सुरू राहिली, हे या शिलालेखावरून दिसून येते.- नितीन अणवेकर, इतिहासतज्ज्ञ