सोलापूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांची दहा-बारा लाखासाठी ईडीने चौकशी केली. शंभर दिवस राऊत यांना तुरुंगात ठेवले. एवढ्या छोट्या रकमेसाठी जर ईडी कारवाई करत असेल तर धुुळ्यातील शासकीय विश्रामगृहावर कोट्यावधी रुपये सापडतात त्यांचे काय? या प्रकरणात ताबडतोब कारवाई करून जबाबदार व्यक्तीला अटक झाली पाहिजे. एवढी मोठी रक्कम कुठून आली याची चौकशी झाली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडले.
दानवे गुरुवारी सोलापूर दौर्यावर होते. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र यावे याकरिता अनिल परब हे प्रयत्न करत आहेत. शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी एक हात पुढे केला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी व्यक्त होणे गरजेचे आहे.
युट्युबवर ज्योती सारखी महिला बॉर्डरवर बिनधास्त फिरते पाकिस्तानात जाऊन मंत्र्यांना भेटते. तिथला पाहुणचार घेते. भारताची माहिती पाकिस्तानला पुरवते. मग आपल्या देशाची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का ? असा सवालही दानवे यांनी केला.
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. याला केवळ फायर ब्रिगेड जबाबदार नसून सर्वच यंत्रणा जबाबदार आहे. प्रत्येक यंत्रणेने आपली जबाबदारी ओळखून काम केले असते तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक कारखान्याची फायर ऑडिट होणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले.