सोलापूर : सोलापूर शहरामध्ये कावळे, घार आणि गिधडस बगळा यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोलापूर शहरात खळबळ माजली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच पशुवैद्यकीय अधिकार्यांनी धर्मवीर संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रॅक आणि खंदक बाग परिसर अलर्ट झोन म्हणून जाहीर केला आहे. 21 दिवस या परिसरात नागरिकांना बंदी घातली आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे.
शहरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात काही कावळे आणि घारींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या वन्य प्राण्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचा अंदाज प्राणी मित्रांनी वर्तवला होता. या प्राण्याचा व्हिसेरा भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविला होता. त्यात या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले यांनी परिसरात येऊन पाहणी केली. तसेच मलेरिया विभागाची टीमही तैनात केली. सकाळी पशुवैद्याकीय विभागाने बॅरिकेटींग लावून परिसर बंदिस्त केला. धर्मवीर संभाजी महाराज महाराज अर्थात कंबर तलाव येथील बोटिंग परिसर, गणपती घाट,
वॉकिंग ट्रॅक, खंदक बागही बॅरिकेटिंग लावून नागरिकांसाठी बंद केली आहे. जनजागृतीसाठी बॅनरही लावले आहेत. परिसर अलर्ट झोन म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात नागरिकांना वावरण्यास बंदी घातली आहे. महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून बाधित परिसरात सोडियम हायपोक्लोराइड, पोटॅशियम परमॅग्गेट ने निर्जंतुकीकरण केला आहे. 21 दिवस हा परिसर नागरिकासाठी बंद राहणार आहे. यामुळे जे नागरिक पक्षांना चारा, पाणी ठेवतात, त्यांनी याबाबत कोणती भूमिका घ्यायला हवी याबाबतही स्पष्टीकरणे आवश्यक आहे.
वन्य प्राण्यांमध्ये हा संसर्ग आढळून आल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने बाधित परिसर सील केला आहे. प्राळीव प्राण्यांमध्ये हा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी चिकन, अंडी, मांस खाताना काळजी घ्यावी. कच्चे मांस खाऊ नये. शिजलेले मांस खात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.-डॉ. सतीश चौगुले, पशुुवैद्यकीय अधिकारी, महापालिका