अकलूज : यशवंतनगर येथे झालेल्या पावणे सहा लाखांच्या रोख रकमेच्या चोरीचा तपास करून अकलूज पोलिसांनी गुजरात राज्यातील तिघांना अटक केली.
यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील बी. एस. कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसच्या ड्रॉवरमधील 5 लाख 45 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद आनंद भोसले यांनी दिली. फिर्यादीनुसार आरोपींचा शोध घेत असताना काही संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. यामध्ये एक चारचाकी वाहनाचा नंबर प्राप्त झाला. तो नंबर व संशयितांचे फुटेज पोलिसांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर व्हायरल करण्यात आले.
दरम्यान, सापुतारा पोलिस ठाणे हद्दीत नाकांबदीदरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसम व वाहन मिळून आल्याचे सांगितले. तपास पथकाने सापुतारा येथे जाऊन अनिलभाई रेवाभाई भांभोरे (वय 27), मिथुनभाई रेवाभाई भांभोरे (वय 34, दोघे रा. नाडेलगांव धुळ महोडी फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद, गुजरात) आणि वकील तेजसिंग भांभोरे (वय 32, रा. अंबाली खजुरीया शिमोडा, फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद गुजरात) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयितांची कसून चौकशी केली असता हा गुन्हा अकलूज येथे केलेल्याची कबुली त्यांनी दिली. चोरी केलेल्या पाच लाख 45 हजार रूपयांच्या रक्कमेपैकी पाच लाख 13 हजार 180 रूपये हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आले. गुन्ह्यात वापरलेले वाहन हुंडाई क्रेटा (जीजे 20 सीबी 2646) जप्त केलेले आहे. या आरोपींना ताब्यात घेऊन अकलूज पोलिस ठाण्यात आणण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आरोपीकडे अधिकच तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारे सांगोला पोलिस ठाणे हददीत चोरी केल्याची कबुली दिली. त्याठिकाणी चोरी केलेल्या चांदीचा मुद्देमाल देखील आरोपीतांकडून जप्त करण्यात आला.