अकलूज : यशवंतनगर येथे झालेल्या पावणेसहा लाख रोख रकमेच्या चोरीचा तपास करून अकलूज पोलिसांनी गुजरात राज्यातील तिघांना अटक केली आहे. यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील बी. एस. कंस्ट्रक्शन ऑफीसचे ड्रॉवरमधील 5 लाख 45हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद आनंद भोसले यांनी दिली होती. या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांचे नेतृत्ताखाली घेत असताना काही संशयीताचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले होते.
यामध्ये एक चार चाकी वाहनाचा नंबर प्राप्त झाला. तो नंबर व संशयिताचे फुटेज संपूर्ण देशातील पोलीसाचे वेगवेगळया व्हॉटसॲप ग्रुपवर पाठविण्यात आले. सापुतारा पोलीस ठाणे हद्दीत नाकांबदी दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित इसम व वाहन मिळून आल्याचे सांगितले.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये तपास पथकाने सापुतारा येथे जाऊन अनिलभाई रेवाभाई भांभोरे (वय 27 ), मिथुनभाई रेवाभाई भांभोरे (34) (दोघे रा. नाडेलगांव धुळ महोडी फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात, आणि वकील तेजसिंग भांभोरे (वय 32) (रा. अंबाली खजुरीया शिमोडा, फलिया, ता. गरबाडा, जि. दाहोद राज्य गुजरात) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे तपास केला असता, आरोपींनी सदरचा गुन्हा अकलूज येथे केलेल्याची कबुली दिली आहे.