अकलूज : अकलूज नगरीची आता अमली पदार्थांची हब म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. यास पोलिस प्रशासन जबाबदार नाही का? असा प्रश्न उपस्थित करुन वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालावे, असे आवाहन अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.
अकलूज मध्ये राजरोसपणे सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीबाबत पत्रकारांशी संवाद साधताना मोहिते पाटील म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील यांच्यापासून ते आज आमच्या तिसर्या पिढीपर्यंत अकलूजचा सहकार, शिक्षण, व्यापार, उद्योग, रोजगार, मेडिकल हब अशी ओळख होती. परंतु, गेल्या एक वर्षापासून ही ओळख पुसून अकलूज हे अमली पदार्थांचे हब अशी ओळख निर्माण झाली आहे. ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक बाब आहे. शांती, समता व बंधुता या त्रिसूत्रीवर अकलूजसह माळशिरस तालुक्याच्या व जिल्ह्याच्या विकासात अकलूजचे योगदान मोलाचे आहे. परंतु, काही समाज कंटक ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्यांना पोलिस प्रशासनाचा वरदहस्त आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे सांगीतले.
अकलूज पाणीपुरवठा योजने बाबत बोलताना मोहिते पाटील म्हणाले, अकलूज - माळेवाडी नगरपरिषदेची लोकसंख्या ही सुमारे 50 हजार झाली आहे. या लोकसंख्येला दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नीरा उजवा कालवा येथे 77 मैलापासून विझोरी तळ्यापर्यंत बंदीस्त पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु झाले आहे. यंदा उन्हाळ्यात नागरिकांना उच्च दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच अकलूज परिसरात पाणी पुरवठा व बंदिस्त गटार योजनेमुळे रस्ते खोदण्यात आले आहे. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. या योजनेचे काम पूर्ण होताच सुमारे 45 किलोमीटरचे सिमेंट रोड मंजूर असून, ते कामही पूर्ण होईल असे सांगितले.