Ajit Pawar
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याला सध्या मुसळधार पाऊस आणि पुराने मोठा फटका बसला आहे. भीमा आणि सीना या प्रमुख नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
अजित पवारांनी आज सकाळी सर्वात आधी कोर्टी गावात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. एका गावकऱ्याने त्यांना नुकसानीची माहिती देत असताना, 'तिकडेही पाहणी करा' अशी विनंती केली. यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, "जाऊ तिकडे पण; आज लवकर अंघोळ करून आला आहेस." उपमुख्यमंत्र्यांच्या या विनोदी टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील देखील उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे शेतीत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.