सोलापूर

सोलापूर : तीन महिन्यांत विमानसेवा सुरू

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचे पाडकाम पूर्ण झाले आहे. सोलापूर विचार मंचच्या गेल्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. चिमणी पाडकामामुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला असून येत्या तीन महिन्यांत विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती सोलापूर विचार मंचचे सदस्य डॉ. संदीप आडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूरला 2008 सालापासून बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गाजर दाखवून फसवणूक केल्याचे जेव्हा आमच्या लक्षात आले तेव्हा आम्ही होटगी रोड विमानतळाचा अट्टाहास धरला. चिमणीबाबतीत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पुढाकार किंवा पाठिंबा दिला नाही. याउलट चुकीच्या अफवा पसरवल्या, ही खेदाची बाब आहे. चिमणी पडल्यामुळे कारखान्याच्या गाळपावर कोणताही परिणाम होणार नाही व पुढील हंगामात पाच हजार मेट्रिक टन गाळप हा कारखाना आपल्या पूर्वीच्या दोन चिमण्यांवर सक्षमरित्या करू शकतो. त्यामुळे याच कारखान्याच्या सभासद शेतकरी व कामगारांनी निश्चिंत राहावे.

धर्मराज काडादींकडून सातत्याने दिशाभूल केली जाते आहे. ही चिमणी संपूर्णता अवैध होती म्हणून पाडण्यात आली, असेही आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पष्ट सांगितल्याची आठवण आडके यांनी करून दिली. कारखान्याचे गाळप न झाल्यास एक हजार 500 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची अफवा पसरली जात आहे. आज नवीन कारखाना 500 कोटी रुपयांत उभा राहतो, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत डायना आडके, विठ्ठल वठारे, रघुनंदन भुतडा उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT