सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या यादीतील दोन हजार ५२९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. शासनाने शुक्रवारी (दि.७) २५ कोटी ३२ लाख ८० हजार ६२९ इतकी रक्कम बँकेत जमा केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली.
शासनाकडून प्राप्त झालेली कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेतील पीककर्ज खात्यांमध्ये जमा करण्यात आली असून, त्यामुळे त्यांची पीककर्ज खाती निरंक (शून्य थकबाकी) झाली आहेत.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी शासनाकडून कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली. या निधीमुळे एकूण २,५२९ कर्ज खात्यांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडीच हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम शासनाने शुक्रवारी जमा केली. त्यामुळे शेतकऱ्यांची पीककर्ज खाती आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहेत.- मुकुंद पवार, जिल्हा उपनिबधंक, सोलापूर