सोलापूर : कृषी अवजारे मिळण्यासाठी महाडीबीटी मधील अर्जास पूर्व मंजुरी देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय 31, रा. सोलापूर) यास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या वडिलांनी कृषी अवजारे मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला होता. या अर्जास पूर्व मंजुरी देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यांनी मंगळवारी लाच मागितल्याबाबत खात्री केली.
बुधवारी (दि.26) उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेटे यांना आठ हजारांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.