सोलापूर : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा प्रभावित झाला आहे. विदर्भात अनेक भागांत इंधन पंपावर ड्रम घेऊन नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतानाच सोलापूर जिल्ह्यात पुढील सात ते आठ दिवस पुरेल इतका इंधन साठा शिल्लक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक साठवणूक करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केले.
जिल्ह्यासाठी प्रति दिवसासाठी पेट्रोल 624 व डिझेलची 1240 केएल आवश्यकता भासते. सध्या कंपन्यांकडे 26 हजार 181 केएल पेट्रोल, 45 हजार 770 केएल डिझेलचा साठा शिल्लक आहे. हा साठा येत्या सात ते आठ दिवसांपर्यंत पुरणार आहे. विशेष म्हणजे सोलापुरात पाकणी येथे तेल साठवणूक डेपो असून, या डेपोमध्ये मुंबई येथील रिफायनरी पाईपलाईनद्वारे इंधनाचा पुरवठा सुरू असून, टंचाई नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
इंधनाच्या काळ्या बाजारास प्रतिबंधासाठी पेट्रोल पंपावर वाहनाशिवाय ड्रम, बाटलीत इंधन मागणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, इंधनाचे प्रयोजन, कोठे घेऊन जाणार तसेच मोबाईलमध्ये फोटो याची नोंद असणारी नोंद वही जतन करा असा आदेश दिला आहे.