सोलापूर : शिक्षकांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवल्याप्रकरणी मुख्याध्यापकांच्या वेतनातून प्रशिक्षणाची वसुली होणार आहे. त्यामुळे कुर्डूवाडी येथील मुख्याध्यापकाची अडचण वाढली आहे.
शासनाच्या शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी न करता 35 शिक्षकांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवल्याप्रकरणी कुर्डूवाडी येथील नूतन हायस्कूलच्या मुख्याध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यासाठी शिक्षक भारती संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुख्याध्यापकांच्या मनमानी व नियमबाह्य कारभाराबाबत शिक्षक भारती संघटनेने तक्रार दाखल केली होती. मार्च 2025 मध्ये डायट कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. त्यानंतर संघटनेच्या वतीने थेट राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत राज्याचे शिक्षण आयुक्तांनी शिक्षण संचालक (माध्यमिक) यांना पत्रव्यवहार करून संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 18 डिसेंबरला माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून, नूतन हायस्कूल कुर्डूवाडी येथील मुख्याध्यापकांच्या वेतनातून शाळेतील 35 शिक्षकांचे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चाची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.