सोलापूर : पत्रकार परिषदेत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम. यावेळी अमोल शिंदे, मनीष काळजे आदी. Pudhari Photo
सोलापूर

मटका, डान्सबारवर दोन दिवसांत कारवाई करा : गृहराज्यमंत्री योगेश कदम

पोलिस आयुक्तालयात घेतली आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरात सध्या अवैध मटका व्यवसायाने गती घेतली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा मटका व तीन पत्त्याचा जुगार सुरु आहे. मटका, जुगार आणि डान्सबार व्यवसायांवर येत्या दोन दिवसांत कारवाई करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता कदम यांनी पोलिस आयुक्तालयात बुधवारी (दि. 7) आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, सोलापूर पोलिस आयुक्तालयांंतर्गत ऑनलाइन गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यावर त्वरीत निर्णय घेणे गरजेचे आहे. गत वर्षात 22 कोटींची आर्थिक फसवणूक झाली आहे. यात रिकव्हरीचे प्रमाण अत्यल्प आहे. यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सायबर क्राईम रोखण्यासाठी एयाअचा वापर करून याला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जगामध्ये ड्रगचे सेवन वाढत आहे. तसेच महाराष्ट्रात याचे प्रमाण वाढत आहे. ड्रगचे सेवन कमी करण्यासाठी शहरातील शंभर शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांना घेऊन जनजागृती करावी. तसेच ड्रग ट्रेडर्सवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. शहर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. यापुढेही अधिकाधिक गुन्ह्यांचा तपास पोलिस करतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या बदल्या संदर्भात कोणताही गैरव्यवहार होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे कदम यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अमोल शिंदे, मनीष काळजे उपस्थित होते.

सोलापूरला लवकरच ड्रग्ज इन्स्पेक्टर

सोलापूरसह महाराष्ट्रात ड्रग्ज इन्स्पेक्टर यांची कमतरता आहे. सोलापूरला ड्रग्ज इन्स्पेक्टर लवकरच दिले जातील. यामुळे औषध विक्रीच्या ठिकाणी होणार्‍या गैरप्रकाराला आळा बसेल. सोलापूरहून कर्नाटक हद्द जवळ आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात होणार्‍या गुटखा तस्करीवर कारवाई करावी, अशा सूचना अन्न-औषध प्रशासन, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना दिल्या.

नवीन पोलिस ठाण्याची गरज

सोलापूरचा झपाट्याने विकास होत आहे. यामुळे पोलिसांची हद्द आणि पोलिस ठाणे वाढविण्याची आवश्यकता आहे. ज्या-ज्या ठिकाणी नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्याची गरज आहे तेथील प्रस्ताव मागविले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतले जातील, असे कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT