सोलापूर

Sachin Kalyanshetti: धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

आ. कल्‍याणशेट्टी यांच्‍या कार्यकर्त्यांचे जिल्‍हाधिकारी, पोलिस आयुक्‍तांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आ. सचिन कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्‍हाधिकारी व पोलिस आयुक्‍तांना देण्यात आले. यावेळी तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्ते उपस्‍थित होते.

आ. कल्‍याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाने जिल्‍ह्यात खळबळ उडाली आहे. कठोर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी आ. कल्याणशेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्‍त कार्यालयावर मोठी गर्दी केली होती. भाजप अक्कलकोट उत्तर मंडलचे अध्यक्ष अमोल हिप्परगे, मध्य मंडलचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्‍त यांना निवेदन दिले.

यावेळी जिल्‍हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, नेताजी खंडागळे, पृथ्वीराज माने, नगरसेवक महेश इंगळे, सद्दाम शेरीकर, सुनंदा स्‍वामी, अंजली शिरसट, महादेवी वाघमोडे, अल्‍फीया कोरबू, कस्‍तुराबाई चौगुले, विकास बुळ्ळा, मळसिद्ध मुगळे आदी उपस्‍थित होते. दरम्‍यान, आ. कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय ७ ऑगस्टला सोलापूर शहरात आले असता महावीर चौक परिसरात दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनचालकासमोर आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

आ. कल्याणशेट्टी यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन संभाव्य धोका लक्षात घेता त्यांना आवश्यकतेनुसार अधिकची व पुरेशी पोलिस सुरक्षा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधीला जीवे मारण्याची धमकी देणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आमदार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून धमकी देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.
- अमोल हिप्परगे, अध्यक्ष, उत्तर मंडल, अक्‍कलकोट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT