पंढरपूर : अधिवेशनाप्रसंगी प. पू. रामगिरी महाराज, प्रकाश महाराज जवंजाळ, सुनील घनवट, शिव व्यंकटेशानंद भारती स्वामी, ह. भ. प. छोटे कदममाऊली, अ‍ॅड. आशुतोष बडवे आदी. Pudhari Photo
सोलापूर

Ashadhi Wari | वारी विरोधात षड्यंत्र रचणार्‍यांवर कारवाई करा : रामगिरी महाराज

वारकरी महाअधिवेशनासाठी 2 हजार वारकर्‍यांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आषाढीवारी चालू असतांना वारीत पुणे येथे वारकर्‍यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटना यांच्याकडून घुसखोरी चालू आहे. कुणीतरी सतत देव, देश, धर्म यांच्यावर आघात घडवून आणत आहे. याच्या मागे कोण आहे हे शोधून काढून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या डोळ्यांसमोर अन्याय, अत्याचार होत असतांना आपण शांत बसणे योग्य नाही.

एक गाल पुढे केल्यावर दुसरा गाल पुढे करा, हे आमच्या संस्कृतीत कधीच नव्हते, तर ते आपल्यावर लादण्यात आले. सत्य, धर्म, न्याय यांसाठी प्राण गेला तरी चालेल; मात्र आपण नेहमी धर्माच्याच बाजूने राहिले पाहिजे, असे आवाहन ‘श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला’चे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांनी केले.

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सदगुरु श्री गंगागिरी महाराज मठ येथे 6 जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनासाठी 2000 पेक्षा अधिक वारकरी व हिंदू भाविक उपस्थित होते. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून वारकर्‍यांशी संवाद साधताना ”वारकरी आणि संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमी वारकर्यांच्या पाठिशी आहे’ असे आश्वासन दिले.

अधिवेशनात विविध संत, महंत, मान्यवर यांनी केलेल्या तेजस्वी मार्गदर्शनानंतर संविधान दिंडीच्या नावाखाली, पुरोगामी, साम्यवादी यांची घुसखोरी वारकर्यांना मान्य नसून यापुढे त्यांनी हिंदु धर्मावर टीका केल्यास ‘जशास तसे उत्तर देण्यात येईल’, असा इशाराही या अधिवेशनात देण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, सुनील घनवट, शिवव्यंकटेशानंद भारती स्वामी, ह.भ.प. छोटे कदममाऊली, अधिवक्ता आशुतोष बडवे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के, ह.भ.प. नारायण महाराज शिंदे, ह.भ.प. मारुती महाराज तुनतुने, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले.

अधिवेशनातील ठराव : पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत. तसेच या सर्व तीर्थक्षेत्री 10 किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी. संत, संत-वाङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा. संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावार. गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. हिंदु युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा. इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी यांसह 11 विविध ठराव संमत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT