टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलिस ठाणे हद्दीतील मौजे शिराळ (टें) येथील खतरनाक आरोपी आण्णासाहेब ऊर्फ आण्णा दिगंबर पाटील (वय 34) याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो सतत गुंगारा देत होता. टेंभुर्णी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अखेर त्याच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. त्याची रवानगी पुणे येथील येरवडा तुरुंगात केली.
आण्णा पाटील यांच्यावर वाळू चोरीचे दोन गंभीर गुन्हे, प्रांताधिकारी अधिकारी व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.2 एप्रिल 2025 मध्येच आण्णा पाटील यास येरवडा जेल येथे स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केला होता.
मात्र आण्णा पाटील मिळून येत नव्हता. यामुळे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती. पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, सपोफौ. विलास रणदिवे, पोहेकॉ संदीप गिरमकर यांना शोधकामी पाठविले होते.आण्णा पाटील याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता तो गोकुळ हॉटेलच्या जवळपास इंदापूर हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यास सापळा लावून अटक करण्यात आली. त्यास येरवडा तुरुंगात पाठविण्यात आले.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर व करमाळा विभागाच्या सहा. पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडली.