दक्षिण सोलापूर : गुरुवारी विजयादशमीचा सण साजरा होत आहे. यादिवशी आपट्याच्या पानेरुपी सोने सीमोल्लंघन करून लोक लुटत असतात. या दिवशी आपट्याच्या पानाला सोने म्हणून एकमेकांना देण्याची प्रथा आहे. मात्र आपट्याची पाने म्हणून लोक आपट्याच्या पानाऐवजी कांचन वृक्षाची पाने सोने म्हणून वाटत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांचन वृक्षाचे फांद्या छाटण्याचे काम नागरिकांकडून होत आहे.
प्रत्येक पिवळी गोष्ट जशी सोने नसते त्याच पद्धतीने आपट्यासारखे दिसणारे प्रत्येक पान आपट्याचेच नसते हे तितकच खरं आहे. दसर्यामध्ये अनेक लोक आपट्याच्या पानाऐवजी कांचन वृक्षाची पाने सोने म्हणून वाटत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांचन वृक्षाचे फांद्या छाटण्याचे काम नागरिकांकडून होत आहे. असे न करता फक्त आणि फक्त आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून वाटण्यात यावीत. आपट्याच्या झाडाची फांद्या न छाटता केवळ त्याची पाने वाटल्यास झाडाची अधिक हानी होणार नाही. या झाडांच्या पानाचे महत्त्व देखील एका दिवसापुरतेच असते, तेव्हा आजचे सोने रूपी झाडांची पाने उद्याचा कचरा आहे, हे देखील नागरिकांनी लक्षात घ्यायला हवा. आपट्याची पाने वाटताना देखील ती अमर्यादपणे न वाटता तोलुन मोलूनच वाटावीत. त्यामुळे त्या आपट्याच्या पानाचे देखील महत्व वाढते आणि दुसर्या दिवशी संभाव्य होणारा कचरा देखील नियंत्रित राहतो.
प्रत्येकाने सणाला देखील नैसर्गिक साधन संपत्तीचा अमर्याद वारेमाप वापर न करता मर्यादित स्वरूपात केल्यास निसर्गाचा समतोल राखण्यास हातभार लागेल. आपटा म्हणजेच निसर्ग या निसर्गाच्या पानाला सोन्याचं मोल या दिनी दिलं जातं. म्हणजेच काय तर निसर्गाला सोन्यासारखं जपुया हाच संदेश या दसर्याचा असतो.