बार्शी : गणेश गोडसे
लातूर येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला घेऊन जाणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात बार्शी तालुका पोलिसांना अवघ्या अर्ध्या तासात यश आले. हा प्रकार काल (मंगळवार) दि २२ रात्री बार्शी-कुर्डूवाडी बह्यावळन रस्त्यावरील गाताचीवाडी चौकात घडला. अपहरण प्रकरणी चौघासह एक कार जप्त करण्यात आली आहे. मुन्ना कांबळे, तुकाराम साळुंखे, मंगेश वंजारी व शंकर कोयाळकर सर्व रा. लातूर अशी अपहरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सहा. पो. नि. दिलीप ढेरे हे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात हजर असताना लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्याचे सपोनी सदानंद भुजबळ यांनी फोनद्वारे माहिती दिली की, गांधी चौक हद्दीतील अल्पवयीन मुलगा (वय 17 वर्षे) रा. लातूर यास चार इसमांनी अपहरण करून त्याला एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून बार्शी मार्गे पळवून नेले जात आहेत. तरी त्यांचा शोध घ्या अशी माहिती दिली.
अशी माहिती प्राप्त होताच तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी दिलीप ढेरे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. सपोनी दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसणे, हवालदार राजेंद्र मंगरुळे यांनी पोलिस पथक नेमून बारशी बायपास रोड, गाताचीवाडी चौक येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. मिळालेल्या प्राथमिक माहिती प्रमाणे वाहने चेक करीत असताना लातूरकडून एक पांढऱ्या रंगाची कार नं. MH 10 BM 4556 ही संशयीतरित्या भरधाववेगाने येत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी सदर कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आणखीन भरधाव वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा रोडवर वाहने आडवी लावून सदर कारला थांविण्यात आले. सदर कारची तपासणी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे आतमध्ये एक घाबरलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलगा व इतर 4 इसम आढळून आले. सदर मुलाकडे विचारपूस केली असता सदर मुलाने सोबतच्या 4 इसमांनी लातून येथून कारमध्ये घालून पळवून आणल्याचे सांगितले. चार अपहरण कर्त्याकडे गाडीतील त्या अल्पवयीन मुलाबाबत चौकशी केली असता काहीएक समाधानकारक उत्तरे दिले नाही.
यावरून सदर अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पळवून नेत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून सदरची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना व सहा. पो.नि. सदानंद भुजबळ यांना कळविण्यात आली. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आल्यानंतर सदर अल्पवयीन मुलगा व आरोपी, गुन्ह्यातील वाहन पूढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
गांधी चौक पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या एका संशयीत आरोपीवर यापुर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून सदरची टोळी ही अतिशय धोकादायक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस अधीक्षक अतूल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे स .पो.नि. दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोहेकों राजेंद्र मंगरुळे, पोहेकों धनराज केकाण, पोहेकों सुभाष सुरवसे, पोकों राहूल बोंदर, पोकों शिवशंकर खराडे, पोकों ओमप्रकाश दासरी यांनी केली आहे.