सोलापूर : शहरातील सब रजिस्टार कार्यालयात शरद नागरी सहकारी बँक शाखा, सोलापूर येथे बनावट कागदपत्रे दाखल करून शरद नागरी बँकेची 86 लाख 19 हजार 959 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जानेवारी 2019 ते जून 2023 दरम्यान घडली. याप्रकरणी दत्तात्रय वसंत चटके (वय 53, रा. लकी चौक) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अरुणा दत्तात्रय इटाई, मनोज संजीव शेरला, मनोजकुमार लल्लनप्रसाद शर्मा, मंगला इटाई, अशोक गायकवाड, शामला महादेव ताकपिरे, जितेंद्र इटाई, जिलानी शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यातील कर्जदार संशयित आरोपी अरुणा इटाई व मनोज शेरला यांनी शरद नागरी सहकारी बँक शाखा सोलापूर येथून तारण मिळकत गहाण ठेवून बँकेकडून 40 लाख रुपये कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न करता एकूण 86 लाख 19 हजारांची थकबाकी बाकी होती. ही रक्कम बाकी असताना रजिस्टर गहाण खत सब रजिस्टर कार्यालय उत्तर सोलापूर -3 येथे तारण म्हणून लिहून दिली. महापालिका हद्दीतील कसबे सोलापूर येथील एक हेक्टर कर्जदार यातील अरुणा इटाई व मनोज शेरला आणि जामीनदार संशयित आरोपी मनोजकुमार शर्मा, मंगला इटाई, अशोक गायकवाड, शामला ताकपिरे, जितेंद्र इटाई, आणि जिलानी शेख यांनी संगनमत करून जून 2023 पर्यंत बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.