File Photo
सोलापूर

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून जिल्ह्यात 800 कोटी वितरित

57 हजार लाभार्थी, राज्यात नवव्या स्थानी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने 82 दिवसातच पूर्ण केले आहे. 82 दिवसात 57,033 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले. योजनेत आतापर्यंत राज्यातील लाभार्थी कुटुंबांना एकूण 800 कोटी रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात थेट देण्यात आले आहे. यामध्ये नागपूर प्रथम क्रमांकावर तर सोलापूर नवव्या क्रमांकावर आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता 500 मेगावॅट विजनिर्मिती करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेणार्‍या घरांची एकूण संख्या दि. 6 डिसेंबर रोजी 71,437 होती व त्यांची एकूण क्षमता 283 मेगावॅट होती. घरांची संख्या 1.25 लाख व एकूण वीजनिर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. या आधी महावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत बसविण्यात आलेल्या पंपांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक करण्याचे शंभर दिवसांचे उद्दिष्ट साठ दिवसांत पूर्ण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती. योजना सुरू झाल्यानंतर 5 डिसेंबरपर्यंत राज्यात 71 हजार 437 हजार घरांना लाभ झाला होता. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला 30 हजार रुपये, दोन किलोवॅटला 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. जास्तीत जास्त अनुदान 78 हजार रुपये आहे. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मिटर मोफत दिला जातो. छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

नागपूर अव्वल

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यामध्ये राज्यात नागपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूरमध्ये आता लाभार्थी घरांची संख्या 21,027 झाली आहे. नागपूरनंतर पुणे (9875 घरे), जळगाव (9489 घरे), छत्रपती संभाजीनगर (8814 घरे), नाशिक (8558 घरे), अमरावती (7119 घरे), कोल्हापूर (6291 घरे), धुळे (4187 घरे) आणि सोलापूर (4007 घरे) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT