सोलापूर : ‘बेटी बचावो-बेटी पढावो’ या ध्येयाला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. विवाह आणि उच्च शिक्षण या दोन्ही महत्त्वपूर्ण बाबींची चिंता मिटवण्यासाठी सोलापूर शहर डाक विभागांतर्गत 72 हजार 350 नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. उच्च शिक्षण आणि विवाह या दोन्ही बाबी संरक्षित करणार्या टपाल खात्याच्या सुकन्या योजनेला त्यामुळेच नागरिकांनी प्रथम पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेसाठी विशेष अभियानही राबवले होते. सुकन्या समृद्धी योजना ही शून्य ते 10 वर्षातील मुलींसाठी आहे. प्रारंभी अडीचशे आणि त्यानंतर शंभर रुपयांच्या पटीत दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये भरण्याची या योजनेत सोय आहे. विशेष म्हणजे मुलगी 18 वर्षाची झाली की तिच्या उच्च शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढण्याची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी वा इतर खर्चिक अभ्यासक्रमाचा ताण ओढवत नाही. जमा असलेली रोख आणि त्यावरील व्याज मिळून जी रक्कम तयार होईल, त्यातील निम्मी रक्कम यासाठी काढता येते, असे सुकन्या योजनेत नमूद आहे. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी सुकन्या योजनेचे खाते उघडले आहे.
टपाल विभागाने ही योजना केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात समाविष्ट केली आहे. त्यामुळे पोस्टाचे बचत खाते, आवर्ती ठेव, डाक जीवन विमा, दरमहा व्याज योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आदींमध्ये या योजनेवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय या योजनेत सर्वात जास्त व्याज दिले जात असल्याने नागरिकांचाही तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.