सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्यासाठी 72 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामध्ये ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी (दि. 15) लागली आहे. त्याआधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम एक, बांधकाम विभाग दोन या दोन्ही विभागाकडून ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्गांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रस्ते करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बांधकाम विभागाकडून इतर जिल्हा मार्गासाठी 53 कामे मंजूर केली आहेत. यासाठी 12 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजूरी दिली आहे. ग्रामीण रस्त्यांची 460 कामे मंजूर केली आहेत. त्यासाठी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच आता जिल्हा परिषदेकडून 513 रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बर्याच ठिकाणी रस्ते होणार आहेत. बांधकाम विभागाने ग्रामीण रस्त्यांना प्राधान्य दिल्याने जवळपास साडेचारशेपेक्षा जास्त रस्त्यांची कामे होणार आहेत.
जिल्ह्यातील पाझर तलाव, गाव तलाव आणि सिमेंट बंधारा दुरस्ती करण्यासाठी 188 कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी 21 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून ही कामे होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बांधकाम आणि जलसंधारण विभागाच्या 93 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामध्ये रस्त्यांचे 513 आणि तलाव दुरुस्तीच्या 188 कामांचा समावेश आहे.-संदीप कोहिणकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी