सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत. बदलीतील तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील 48 शाळेत एकही शिक्षक शिल्लक राहणार नाही. त्यामुळे त्या शाळा शिक्षकाविनाच राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील तीन हजार 737 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या आहेत, त्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी बदलीचे शिक्षक तसेच शिक्षक संघटना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन करत आहेत. मात्र, बदलीतील तांत्रिक अडचणीमुळे अनेक शाळेत शून्य शिक्षक शिल्लक राहणार आहेत. तसेच दीडशेपेक्षा जास्त शाळेत एकच शिक्षक शिल्लक राहणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाकडे बदल्याविषयी मार्गदर्शन मागविले आहे.
शिक्षण विभागाकडे हेलपाटे
जिल्ह्यात साडेतीन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. ते शिक्षक कार्यमुक्तीचा आदेश मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, बदलीतील तांत्रिक अडचणीमुळे बरेच शाळेत शिक्षक शिल्लक राहणार नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही.
ऑनलाइन बदल्यामुळे बर्याच शाळेत अतिरिक्त शिक्षक झाले आहेत. तसेच अनेक शाळेत एकही शिक्षक शिल्लक राहणार नाही. तर 176 शाळेमध्ये एकच शिक्षक मिळणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने बदलीतील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. त्यानंतर शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश दिल्यानंतर सर्व शाळांना न्याय मिळणार आहे.- राम शिंदे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना