सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
जुनी पेन्शन लागू करा, विद्यार्थ्यांना शिकवू द्या, कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा, आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी महामोर्चा काढल्याने जिल्ह्यातील जवळपास दोन हजार 500 शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (दि. 25) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. त्यावेळी जिल्ह्यातील आठ हजार 703 शिक्षक रजा घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार 777 पैकी दोन हजार 500 शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
जिल्हा परिषदेचे जिल्ह्यात 10 हजार शिक्षक आहेत. त्यातील आठ हजार 703 शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन मोचार्र्मध्ये सहभागी झाले होते. उर्वरित शिक्षकांनी जिल्ह्यातील 300 शाळा सुरु ठेवल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के शाळा बंद असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेेचे एकूण 10 हजार शिक्षक आहेत. त्यातील आठ हजार 703 शिक्षकांनी रजा घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी 300 शाळाच सुरू होत्या. इतर शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवल्या होत्या.-कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी काढलेल्या महामोर्चात नऊ हजार शिक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील दोन हजार 777 शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. शासनाने याची दखल घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात; अन्यथा यापुढेही असा विराटमोर्चा पुन्हा काढण्यात येईल.-राम शिंदे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना