सावकारी जाच ! Pudhari News Network
सोलापूर

सोलापूर : 25 लाखांचा माल अडवला, व्याजाचा फास आवळला!

सोलापुरातील टॉवेल कारखानदाराची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही तारण ठेवलेला लाखो रुपयांचा माल परत देण्यास नकार देत, उलट अधिक पैशांची मागणी करणार्‍या सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका टॉवेल कारखानदाराने आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना सोलापुरात घडली आहे. प्रकाश तुळजाराम एक्कलदेवी (वय 57, रा. शास्त्रीनगर) असे या दुर्दैवी कारखानदाराचे नाव असून, या घटनेने सोलापूरच्या उद्योग वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रकाश एक्कलदेवी हे ‘भवानी एन्टरप्रायझेस’ नावाच्या टॉवेल कारखान्याचे मालक होते. व्यवसायातील आर्थिक गरजेमुळे त्यांनी 2022 मध्ये आपल्या गोदामातील तयार असलेला तब्बल 25 लाख रुपयांचा टॉवेलचा साठा, श्रीकांत मदनलाल बलदवा (रा. सोलापूर) यांच्या ‘श्रीस्नेह एन्टरप्रायझेस’कडे तारण ठेवला होता. या मालावर त्यांनी दरमहा चार टक्के व्याजदराने 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

जून 2025 पर्यंत एक्कलदेवी यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासहित अदा केली. त्यानंतर त्यांनी आपला तारण ठेवलेला 25 लाखांचा माल परत मागितला. मात्र, यावेळी आरोपी बलदवा यांनी धक्कादायक पवित्रा घेतला. तुझा कोणताही माल माझ्याकडे नाही, उलट तुझेच अजून 10 लाख रुपये माझ्याकडे देणे बाकी आहे, असे म्हणत त्याने माल देण्यास साफ नकार दिला. इतकेच नाही, तर त्याने वकिलामार्फत एक्कलदेवी यांना 4 लाख 95 हजार रुपये देण्याची खोटी नोटीसही पाठवली.

माल परत न मिळण्याची चिंता व सावकाराचा वाढता दबाव, या दुहेरी कात्रीत सापडलेल्या प्रकाश एक्कलदेवी यांनी अखेर एक टोकाचे पाऊल उचलले.आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी, मयत प्रकाश एक्कलदेवी यांचे सुपुत्र युवराज एक्कलदेवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी श्रीकांत मदनलाल बलदवा याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, खोट्या नोटिसा पाठवून मानसिक छळ करणे, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाचे उल्लंघन आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक बनसुडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घटनेचा दुर्दैवी क्रम:

-25 लाखांच्या मालावर 4% व्याजाने 10 लाखांचे कर्ज.

- जून 2025 मध्ये मुद्दल आणि व्याजासह संपूर्ण रकमेची परतफेड.

- माल परत देण्यास नकार आणि उलट अधिक पैशांची मागणी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT