मोहोळ : शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 21 लाख 54 हजार 941 विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार असून पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि पायमोजेही (सॉक्स) देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
शिक्षण विभागाकडून प्रत्येक तालुक्यात पुस्तके पोहोच झाली असून तालुका स्तरावरूनही केंद्रस्तरावर आणि केंद्रातून प्रत्येक शाळेला पुस्तके पोहोच झाली आहेत. गणवेश बूट आणि पायमोजे यासाठी शासनाकडून प्रत्येक तालुका शिक्षण विभागास आवश्यक निधी प्राप्त झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार असून, या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभाग युद्धपातळीवर काम करत असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, एससीईआरटीच्या मार्गदर्शनाप्रमाणे बालभारतीकडून सदर पुस्तकांचा पुरवठा झाला असून, एकूण 93.52 टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण होणार आहे. मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमांची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. केंद्रातील प्रत्येक शाळेत पुस्तके पोहोच झाली आहेत. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्यासह विस्ताराधिकारी मल्लिनाथ स्वामी, विस्तार अधिकारी बंडू शिंदे, महेश लोंढे, राम नवले, तानाजी देशमुख, सुरेखा कांबळे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळणार आहेत.
मोहोळ तालुक्यातील 12 हजार 720 विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून एका गणवेशासाठी 300 रुपयांप्रमाणे तर 6 हजार 966 विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून 300 रुपयांप्रमाणे एकूण 19,686 विद्यार्थ्यांना 59 लाख 5,880 रुपये प्राप्त झाले आहेत. बूट आणि पायमोजांसाठी 20,444 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 170 रुपयांप्रमाणे 34 लाख 75, 480 रुपये प्राप्त झाले आहेत, असे तालुका गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांनी सांगितले.