सोलापूर : जिल्ह्यात लम्पी आजाराचा फैलाव वाढत आहे. आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. त्यातील 700 जनावरे बरी झाली असून, 19 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी लम्पी संसर्ग झालेले क्षेत्र प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. तसेच जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले असून, लम्पी प्रतिबंधक लस बंधनकारक केले आहे. त्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात लम्पीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे.
गायवर्ग जनावरांना याचा सर्वाधिक धोका असल्याने जिल्ह्यातील गायवर्ग जनावरांना लम्पीचा डोस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक जनावरांना लम्पीचे लसीकरण बाकी असल्याने लम्पी आजाराचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे उर्वरित जनावरांना लम्पीचा डोस देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात गायवर्ग, म्हैसवर्ग जनावरांची संख्या मोठी आहे. लम्पी आजाराचा धोका गायवर्ग म्हणजेच गाय, बैल, कालवड, खोंड या जनावरांना जास्त आहे. त्यामुळे प्राधान्याने गायवर्ग जनावरांना लम्पीचा डोस पशुसंवर्धन विभागाकडून दिल्याचा दावा विभाग करत आहे.
लम्पी हा संसर्गजन्य आजार आहे. लम्पी झालेल्या जनावरांना डास चावला आणि तोच डास दुसर्या जनावरांना चावल्यास त्या जनावरांना लम्पीची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे लम्पी आजाराची लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांजवळ न बांधता दुसर्या ठिकाणी बांधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.