सोलापूर : केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 172 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी घडली. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
केगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात एक हजार 350 पोलिस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास यातील काही प्रशिक्षणार्थींना मळमळ सुरू झाली. ही घटना समजताच वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी शाासकीय रुग्णालयात दाखल केले. एकापाठोपाठ एक अशा 172 जणांना त्रास सुरू झाला. सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले. दुपारनंतर यातील अनेकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळपर्यंत 12 प्रशिक्षणार्थींवर उपचार सुरू होते. हा त्रास नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती मिळाली नाही.
रात्रीच्या अन्नाचे नमुने घेतले
पोलिस प्रशिक्षण केंद्रात एक हजार 350 प्रशिक्षणार्थी आहेत. पैकी 172 जणांना त्रास कसा झाला याचा शोध सुरू आहे. सकाळी ही घटना झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाची टीम प्रशिक्षण केंद्रात दाखल झाली. त्यांनी रात्रीच्या अन्नाचे व इतर नमुने घेतले.
172 जणांना बुधवारी सकाळी त्रास सुरू झाला. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. यातील दहा ते बारा जणांवर उपचार सुरू आहेत. अन्नातून विषबाधा झाली असती तर सर्वांना त्रास झाला असता. अॅसिडीटी अथवा अपचन यामुळे हा त्रास झाला असावा असा अंदाज आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.- विजयकुमार चव्हाण, प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर