कुर्डूवाडी : सीना माढा उपसा सिंचन योजनेतील कोरडा पडलेला घाटणे ओढ्यावरील बंधारा. Pudhari Photo
सोलापूर

सीना-माढा योजनेतील 13 गावे पाण्यापासून वंचितच

पिके लागली देशोधडीला, राजकीय षडयंत्राचा संजय घाटणेकरांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कुर्डूवाडी : माढा तालुक्याला वरदायिनी असलेल्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील दोन आवर्तने झाली आहेत. ऐन उन्हाळ्यात माढा तालुक्यातील तेरा गावांना दोन्ही वेळा पाणी न मिळाल्यानेे येथील उभी पिके जळून चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता जलसंपदा विभागाकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील- घाटणेकर यांनी सांगितले.

संजय पाटील -घाटणेकर यांनी आरोप केला की, सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पावणे पाच टीएमसी पाणी माढा तालुक्याला राखीव आहे. या योजनेच्या तीन यापैकी दोन आवर्तने झाली आहेत. पुढील आवर्तन दिवाळीत आहे. या आधीच्या काळात या योजनेचे पाणी सर्व शेतकर्‍यांना पुरवण्यात येत होते. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मोठ्या कष्टाने सत्ता परिवर्तन केले. तरीही या 13 गावच्या शेतकर्‍यांच्या वाट्याला दुष्काळच आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या योजनेवर अवलंबून असलेली घाटणे, पडसाळी, मोडनिंब, वडाचीवाडी, वेताळवाडी, रणदिवेवाडी, जाधववाडी, चिंचोली, गोरेवाडी, भोसरे, अकुंबे व लऊळचा निम्मा भागात या योजनेची दोन अवर्तने झाली आहेत. मात्र उन्हाळ्यात या गावात पाण्याचा एक थेंबही आलेला नाही. आजपर्यंत या गावकर्‍यांनी संघर्ष करून वेळोवेळी पाणी आणून बंधारे भरून घेत होते मात्र आता आपल्याच विचाराचा आमदार खासदार असल्यामुळे या भागात पाणी येईल वाटले होते मात्र आपल्याच या दोन्ही लोकांनी घात केल्याचे घाटणेकर यांनी आरोप केला. पाण्याबाबत जलसंपदा विभागाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

13 गावात पाणी न आल्यामुळे काही शेतकर्‍यांनी कुर्डूवाडी येथे आमदार अभिजीत पाटील यांना नगरपालिका कार्यालयात गाठले. त्यांना पाण्याबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले होते, मला अधिकार्‍यांनी पाणी सोडतो असे सांगितले होते. मात्र त्यांनी मला फसवले आहे.
-दिलीप गोरे, शेतकरी लऊळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT