Child murder news Online Pudhari
सोलापूर

Child murder: तेरा महिन्याच्या चिमुकलीचा गळा दाबून खून

मृतदेहाचे तुकडे करुन प्रेत शेतात पुरले; आरोपी चुलत्याला 24 तासांत बेड्या

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथे एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करीत तिच्या मृतदेहाचे कोयत्याने तुकडे करुन ते पोत्यात भरुन शेतातील चारीत पुरल्याप्रकरणी तिच्या चुलत्याला पोलिसांनी काही तासात बेड्या ठोकल्या. ही संतापजनक घटना तामलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

शंकरेश्वर माने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा भाऊ महादेव माने यांनी त्यांची 13 महिन्याची मुलगी अज्ञाताने शनिवारी (28 फेब्रुवारी) घरातून पळवून नेल्याची खबर पोलिसात दिली होती.पोलिसांनी प्रथमदर्शनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. दरम्यान स.पो.निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत वेगाने तपास सुरू केला. त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी सदर मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत सर्व प्रकार उघड केला. सदर गुन्ह्याला कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

आरोपीची भावजय पर पुरूषासोबत पळून गेल्याचा राग त्याच्या मनात होता.परिणामी तिला झालेली मुलगी आपल्या भावाची नाही असाही संशय आरोपीच्या मनात घर करुन होता. त्यातूनच त्याने 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान निष्पाप चिमुकलीला घरातून उचलून शेतात नेले तिथे तिचा गळा दाबून खून केला.

मृतदेहाचे कोयत्याने तुकडे करुन ते पोत्यात भरून शेतातील चारीत पुरले.त्यानंतर पोलिसांनी स्थळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.केवळ संशयाने आरोपीने हे गंभीर कृत्य केल्याचे उघड झाले.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरात कौतुक होत असून आरोपीला काही तासात बेड्या ठोकल्यानंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

धाराशिवच्या पोलिस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शफाकत आमना व डॉ.निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर, पोलिस हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले, सूरज नरवडे, नाझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख, मनोज गोबाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT