सोलापूर : 12 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धनाजी सोपान इंगळे (वय 48, रा. पाटकूल, ता. मोहोळ) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
14 एप्रिल 2023 रोजी शिक्षक आरोपी धनाजी इंगळे वर्गात उपस्थित होता. तेव्हा त्याने पीडितेला वर्गात थांबवून इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्याने वर्गामध्येच पीडितेवर शारीरीक लैंगिक अत्याचार केले.
ही घटना शाळेशेजारी शेतात काम करण्याऱ्या शेतकऱ्याने पाहिली. त्यानंतर 15 एप्रिल 2023 रोजी त्याच्या भावाच्या मदतीने शेतकाऱ्याने त्या वर्गामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावला. यामध्ये दुसऱ्या पिडीतोसाबत गैरवर्तन करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर इंगळे याने अशा प्रकारचे दोन ते तीन कारनामे केल्याचे उघड झाले. त्यानंतर अत्याचार झालेल्या पिडीतेच्या वडिलांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे दोन्ही पिडीतांनी न्यायालयात कोणताच जबाब दिला नाही.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी, पिडीता, शेतकरी, त्याचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले होते तो, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पिडीता जरी न्यायालयासमोर आली नाही तरी चित्रिकरण तसेच तपासणी अहवाल यावरुन आरोपीने गुन्हा केला असून सर्वेाच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिश सुरवसे यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप तसेच पिडीतेस 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. याप्रकरणात सरकारच्यावतीने ॲड. शीतल डोके यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड. धनंजय माने यांनी काम पाहिले.