सांगोला : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हॅल्युएटरसह 12 जणांनी संगनमताने खोटे सोने खरे असल्याचे भासवून बँकेचा विश्वासघात केला. बँकेकडून कर्ज घेऊन सुमारे 17 लाख 44 हजार रुपयांची बँकेच्या अजनाळे (ता. सांगोला) शाखेची फसवणूक केली. ही घटना फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत घडली. याविषयी सुहास लोखंडे यांनी सांगोला फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी युवराज प्रल्हाद ठोकळे, शारदा संजय शेवतकर, रमेश दिगंबर पंडित, रोहित संजय शेवतकर, सुनीता रमाकांत येदवर, कोमल शंकर बंडगर, मनीषा बाळासो येलपले, अनिता हरिदास कोळवले, किसन रामू एरंडे, रमेश मारुती शेंबडे, शंतनू महादेव पंडित यांच्यासह व्हॅल्यूएटर संजय दत्तात्रय पंडित (सर्व रा. अजनाळे) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सर्व संशयितांसह बँकेचे व्हॅल्यूएटर संजय पंडित यांनी संगनमताने सोन्याचे दागिने नसतानाही तसे असल्याचे भासवून बँकेचा विश्वासघात केला. बँकेच्या छापील फॉर्ममध्ये खोटी माहिती भरून दिली. बनावट कागदपत्रे तयार करून ती व त्यामधील मजकूर खरा असल्याचे भासवले. स्वतःच्या फायद्यासाठी व्हॅल्यूएटर संजय पंडितने बँकेस संबंधितांना कर्ज देण्यास भाग पाडले. यामुळे बँकेची सुमारे 17 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक झाली. याविषयी तपास पोलीस नाईक बाबासाहेब पाटील करीत आहेत.