सोलापूर : जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवद यांची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आणखी अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामध्ये विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजू सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे, विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर या अकरा आरोपींना जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
याबाबत माहिती अशी की, मृताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय 25, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती. अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. दि. 2 जानेवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4.45 च्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली. त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शनिवारी (दि.3) अमर शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, तानाजी बापू शिंदे या चार आरोपींना अटक करण्यात आली होती ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडी मिळाली. आरोपी तर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड.राहुल रूपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. ज्योती वाघमारे यांनी काम पाहिले.
तासवडे टोलनाक्यावर चौघांना घेतले ताब्यात
सातारा येथील पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाका परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर संशयितांना सोलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. शंकर बाबु शिंदे, सुनील शंकर शिंदे, आलोक तानाजी शिंदे (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) आणि महेश शिवाजी भोसले (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) अशी त्यांची नावे आहेत.