सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात हत्या झाली. त्या प्रकरणाविरोधात जिल्ह्यातील सरपंच परिषद संघटना आक्रमक झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, वाल्मीक कराडवर 302 गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील सरपंच परिषदेने 1025 ग्रामपंचायती गुरुवारी (दि. 9) बंद ठेवून कामबंद आंदोलन केले.
सरपंच देशमुखांची हत्या झाल्यापासून सरपंच परिषद संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. तरीही मंत्री मुंडे हे राजीनामा देत नाही. तसेच वाल्मीक कराड यांच्यावर 302 गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सरपंच परिषदेने सर्वच ग्रामपंचायती बंद ठेवून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवल्या होत्या. मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मुख्य आरोपींना फाशी द्यावी तसेच वाल्मीक कराड यांच्यावर 302 गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती बंद ठेवून आंदोलन केले.-विकास जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, सरपंच परिषद
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना शिक्षा व्हावी, यासाठी सरपंच परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवल्या होत्या. त्यास महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटनेने पाठिंबा दिला आहे.- शरद भुजबळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन