सोलापूर : जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ‘लम्पी’चे एक लाख 90 हजार 400 लस खरेदी करण्यात आले आहे. तसेच त्यांचे तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे. काही दिवसांत जनावरांना लंपीचे लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रकोप वाढत असून, आतापर्यंत दोन हजार जनावरे बाधित झाले आहेत. त्यातील 57 जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात ‘लम्पी’मुळे जनावरे दगावण्याची प्रमाणात वाढत असल्याने जिल्हा परिषदेने सेस फंडातून पंधरा लाख रुपयांची औषधे खरेदी केली. तसेच त्याचे तालुकास्तरावर तत्काळ वितरण केले आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील 70 टक्के जनावरांना ‘लम्पी’चे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच उर्वरित जनावरे लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बाकी होते. मात्र, प्रभारी जिल्हाधिकारी तथा सीईओ कुलदीप जंगम यांनी तत्काळ लंपी लस खरेदी करून वितरण केले आहे. जिल्ह्यातील उर्वरित जनावरांना लंपी लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रकोप वाढत असल्याने गायवर्ग जनावरांना तातडीने लसीकरण करण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकार्यांना दिले आहे. जिल्ह्यात जवळपास 80 टक्के जनावरांना ‘लम्पी’चे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित जनावरांना लसीकरण करण्यासाठी एक लाख 90 हजार लसीचे वाटप केले आहे.-डॉ. विशाल येवले, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय