प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
महाराष्ट्र

'जिंकलेल्या डावाचे पराभवात कसे रुंपातर करावे हे काँग्रेसकडूनच शिकावे'

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणा राज्‍यात पुन्‍हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल, अशा शब्‍दांमध्‍ये शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'च्‍या अग्रलेखातून हरियाणा विधानसभा निवडणुकीचे विश्‍लेषण करण्‍यात आले आहे. तसेच भाजपच्या 'मजबूत संघटना आणि रणनीती' कडे लक्ष वेधत काँग्रेसने तळागाळात लक्ष देण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

भूपिंदरसिंग हुड्डांना पक्षाची नौका डुबवली काय?

हरियाणा काँग्रेसचे नेते व माजी मुख्‍यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी काँग्रेस पक्षाची नौका डुबवली काय, असा सवाल करत सामनाच्‍या अग्रलेखात म्‍हटलं आहे की, काँग्रेसचे सूत्रधार आपणच व आपण ठरवू तेच उमेदवार अशी श्री. हुड्डा यांची भूमिका होती. पक्षातील कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा जाहीर अपमान हुड्डा तसेच त्यांच्या लोकांनी केला. काँग्रेसचे दिल्लीतील हायकमांड हुड्डा यांना रोखण्यात अपयशी ठरले. हरयाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन केले. हरयाणातील महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगावर भाजपने व त्यांच्या पंतप्रधानांनी कोणतीच कारवाई केली नाही. सगळ्याची चीड हरयाणातील जनतेत स्पष्ट दिसत होती. अर्थात विनेश फोगाट स्वतः जिंकली तरी तिच्यावरील अन्यायामुळे हरयाणात सर्वदूर निर्माण झालेल्या संतापाचा, नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला नाही.

भाजपचे संघटन मजबूत तर काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल

हरयाणात भाजपविरोधी लाट होती व त्या लाटेत भाजप वाहून जाईल असे सांगितले जात होते, पण तसे घडले नाही. कारण काँग्रेसचे संघटन विस्कळीत व हतबल होते. राजकारणात व निवडणुकीत संघटन जमिनीवर असावे लागते. भाजपचे संघटन मजबूत होते व ‘स्ट्रटेजी’ बिनचूक ठरली, असेही सामनाच्‍या अग्रलेखात नमूद करण्‍यात आले आहे. मध्य प्रदेशात कमलनाथांनी भाजपला सरळ मदत केली. हरयाणात हुड्डा यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा होता, तरीही हुड्डा हे काँग्रेसबरोबरच राहिले. हरयाणातील जाट समुदायाचे ते मोठे नेते, पण इतर समाजाला ते काँग्रेसबरोबर उभे करू शकले नाहीत. जाट विरुद्ध इतर समाज असा हा सामना झाला व त्यात भाजपने बाजी मारली. पुन्हा हरयाणातील भाजप विजयात बलात्काराच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी ‘पॅरोल’वर सुटून बाहेर आलेल्या बाबा राम रहीम याचाही ‘वाटा’ आहेच, असेही सामना अग्रलेखात म्‍हटलं आहे.

काँग्रेसने ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवले

हरियाणात काँग्रेसने ‘आप’सह अनेक घटकांना दूर ठेवले. या खेळात संपूर्ण राज्यच हातचे गेले. जम्मू-कश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीचा विजय झाला. हरयाणात फक्त काँग्रेसची पीछेहाट झाली. हे चित्र ‘इंडिया आघाडी’साठी बरे नाही, पण लक्षात कोण घेणार?, असा सवालही अग्रलेखातून करण्‍यात आलाआहे.

हरियाणा निवडणूक निकालाचा महाराष्‍ट्रावर परिणाम होणार नाही

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर येणार नाही, असा विश्वास होता;पण काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ भाजपसाठी फायदेशीर ठरला. हरियाणा निवडणुकीच्या निकालांचा त्यांच्या राज्यातील संबंधांवर परिणाम होणार नाही, महाराष्ट्रातील जनता हरियाणाच्या वाटेवर चालणार नाही. राज्‍यात महाविकास आघाडी (ठाकरे सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती) विजयी होईल. असा विश्‍वासही अग्रलेखातून व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT