परळी : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव जिल्हाभर उत्साहाने साजरा होत आहे. मात्र कास, बामणोलीच्या कोपर्यावर असलेली कात्रेवाडी, पिसाडी, कारगाव, आंबवडे ही गावे या महोत्सवात सहभागी होणार नाहीत. रस्ता नाही, गावठाण नाही इतर सुविधाही नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ध्वजाचा अवमान न करता त्याचा आदर राखत 15 ऑगस्ट रोजी फक्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे या गावकर्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सातारा ते कास व कासपासून डाव्याबाजून धावली आणि जळकेवाडी असा रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची जणू पायवाटच होते. जळकेवाडीपासून कात्रेवाडीला जाण्यासाठी डोंगरातून पायवाट आहे. कात्रेवाडीपासून पिसाडीला जायचे म्हटल्यावर या रस्त्याला पायवाट म्हणाव की जंगल अशी स्थिती. पिसाडीपासून आंबवडे व कारगावला जायचे म्हटल्यावर त्याच्या पायात बळ पाहिजे आणि इच्छाशक्ति पाहिजे तरच तो गावात जाऊ शकतो. यासह विविध अडचणींचा सामना हे गावकरी आजही करत आहेत.
'हर घर तिरंगा' फडकवण्यासाठी कारगावमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच निलम चव्हाण, उपसरपंच राजाराम शिंदे, ग्रामसेवक संदीप लोखंडे, कृषी परिवेक्षक बेचके व ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत ग्रामस्थांनी देशाला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्याला काय असा सूर उमटवला. आम्ही कोयना भुकंपग्रस्त, प्रकल्पग्रसत असून मूळ कात्रेवाडी गाव सोडून आमची तिसरी पिढी या जंगलात राहत आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार? गावठान नाही इतर सुविधा नाही. या गोष्टींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ध्वजाचा अवमान न करता त्याचा आदर राखला जाईल. 'हर घर तिरंगा' या उपक्रमात सहभागी न होता 15 ऑगस्ट रोजी गावाच्या मुख्य बाजूस ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे निवेदन गावकर्यांनी जिल्हधिकार्यांना दिले आहे.