सातारा

साताऱ्यात गुंडांकडून पोलिसांना मारहाण; ताब्यात घेतल्यानंतरही दोघांचे पलायन

अनुराधा कोरवी

सातारा : पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यात फौजदारासह पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवराज पेट्रोल पंप परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोघांनी पलायन केले आहे. दरम्यान, सराईत गुन्हेगार अक्षय पवार (रा. रविवार पेठ, सातारा) याला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष ज्ञानोबा शेलार (वय ३८, रा. खेड, ता. सातारा) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असून त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार पोलिस संतोष शेलार हे शुक्रवारी मध्यरात्री रात्र गस्तीसाठी तैनात होते. त्यांच्यासोबत फौजदार वाघमोडे होते. रात्री दीड वाजता दोन्ही पोलिस शिवराज पेट्रोल पंप परिसरातील एका हॉटेलजवळ गेले असता तेथे काहीजण गोंधळ घालत होते. दोन्ही पोलिसांनी संबंधितांना शांततेचे आवाहन करुन तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, संशयित अक्षय पवार व त्याच्या दोन्ही साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना उद्देशून 'आम्ही कोण आहे? तुम्हाला सोडणार नाही.' असे म्हणत धमकी दिली. यावेळी एका संशयिताने तक्रारदार पोलिस यांना थेट धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

घटनेचे गांभिर्य ओळखून फौजदार वाघमोडे यांनी पोलिस ठाण्याला फोन करून अधिक कुमक मागवली. तोपर्यंत एका संशयिताने फौजदार यांनाही धक्काबुक्की करत तक्रारदार शेलार यांच्या डोळ्यावर दुचाकीच्या चावीने हल्ला केला. यामध्ये ते जखमी झाले. पोलिस व संशयितांमध्ये सुमारे १५-२० मिनीटे झटापट सुरु होती. ही घटना घडत असतानाच मदतीसाठी पोलिसांची दुसरी व्हॅन आली. सर्व पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. तरीही संशयित सर्व पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करत होते.

पोलिस व्हॅन शहर ठाण्यासमोर आल्यानंतर दोन संशयितांनी पोलिसांसमोरच पलायन केले. दरम्यान, जखमी पोलिस संतोष शेलार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी पहाटे संशयितांवर शासकीय कामात अडथळ्यासह विविध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT