सातारा

सातार्‍याचं वाटोळं थांबवा : दीपक पवार

मोहन कारंडे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सध्या सातारा शहरांमध्ये यवतेश्वर ते कास या रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामाबद्दल आमदार आणि खासदार यांच्यामध्ये वाक् युद्ध सुरू आहे. परंतु या सर्वांनी सगळ्यात पहिल्यांदा सातारा शहराचं वाटोळं थांबवावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांनी लगावला आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दीपक पवार यांनी म्हटले आहे की, चार भिंती, अजिंक्यतारा, बोगदा, महादरे व पेढ्याच्या भैरोबा, कास यवतेश्वर ही आमची सातारा शहराची फुफुसे आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सर्व परिसराला अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम यांनी विळखा घातलेला आहे आणि तुम्ही मंडळी यवतेश्वर कास रस्त्याबद्दल बोलत आहात. आधी आपल्या शहराचा विचार करा आणि तिथली बांधकामे पाडा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

दीपक पवार यांनी पुढे म्हटले आहे की, अत्यंत सोयीने सर्वजण बोलत असतात. आमदार म्हणतात बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा आणि खासदार म्हणतात बाहेरच्या लोकांचे बांधकाम पाडा आणि स्थानिक लोकांचे बांधकाम ठेवा. सातारा शहरांमध्ये असलेली बांधकामे कोणत्या धर्तीवर पाडायची, बाहेरचे आहेत की स्थानिक म्हणून. चार भिंती गिळंकृत झालेली आहे, अजिंक्यताराच्या दरवाजापर्यंत आता अतिक्रमणाची घरे येऊ लागतील. बोगदा परिसर संपूर्ण अतिक्रमीत झालेला आहे. पेढ्याच्या भैरोेबाजवळदेखील अतिक्रमणाला सुरुवात झाली आहे. महादरे येथे फॉरेस्ट क्षेत्र असल्यामुळे हा परिसर अतिक्रमणापासून राहिला आहे. केवळ आणि केवळ यवतेश्वर कास रस्ता हाच खर्‍या अर्थाने निसर्ग संपन्न आणि मोकळा श्वास घेण्यासारखा राहिलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा शहरातील तरुणाई, त्याचबरोबर कुटुंबीय, त्यांचे पै पाहुणे, मित्रपरिवार, या ठिकाणी आवर्जून येत असतात. मात्र, या ठिकाणीही आता बाजार झाला आहे. अवैध धंदे, त्याचबरोबर रस्त्याच्या कट्ट्यावर राजरोसपणे बसून दारूच्या बाटल्या फोडणे, असे प्रकार होवू लागल्यामुळे हा संपूर्ण परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निसर्ग आणि पर्यावरण वाचवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बेकायदेशीर बांधकाम तोडणे हे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मध्यंतरी विधानसभेमध्ये आपल्या आमदारांनी गर्जना केली की विधान भवन परिसरामध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक व्हावे, ही बाब चांगली आहे. माझे आमदारांना एकच सांगणे आहे की गेली 50 वर्षे सातारा शहरांमध्ये आपल्या दोनच कुटुंबाची सत्ता आहे. आपण आपल्या साखर कारखाना अथवा 35 वर्षे सातारा शहराची नगरपालिका आपल्या हातामध्ये होती त्यावेळी शिवस्मारक का उभारले नाही? विधानसभेने, कायदे मंडळाने कायदे बनवलेले आहेत की जे बेकायदेशीर बांधकाम असेल ते तोडले पाहिजे. पण आपण सांगता बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा हे कुठल्या तत्वात बसते? आपले काही कंत्राटी किंवा बगलबच्चे असतील त्यांच्यासाठी जर का तुम्ही कायदा मोडत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे, अशी टिकाही पवारांनी केली आहे.

आपण तीन ते चार लाख मतदारांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहात. या मतदार संघातील सर्व लोक मुकी किंवा आंधळी नाहीत. त्यामुळे आपल्यावरती याचा परिणाम होत नाही असा काही समज आपण करू नये. सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघातील पर्यावरणाचा आणि निसर्गाचा र्‍हास करण्याचा सपाटा आमदारांनी लावलेला आहे. आमच्या सुंदर, सजलाम्, सुफलाम्, जावली तालुक्यामध्ये गणपतीचा माळ, महिगाव, वाघेश्वर, आंबेघर या ठिकाणी सुरू केलेल्या दगडाच्या खाणी व स्टोन क्रशर हे कुणाच्या आशीर्वादाने चाललेले याचे उत्तर आमदारांनी द्यावे. कास ते महाबळेश्वर राजमार्गावरती जे मोठ मोठे टॉवर म्हणजेच (पवन चक्क्या) उभे आहेत त्या कोणाच्या आहेत? त्यांचे नाव सांगावे व त्याला कायदेशीर परवानगी आहेत का? असं लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जनतेला सांगावं. कृपा करून गणपती बसलेले आहेत सणासुदीच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही काही पत्रक बाजी करत असाल तर ती चुकीची आहे ती तत्काळ थांबवा, असे आवाहनही पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सातारा शहरापासून ते यवतेश्वर ते कास रस्त्यापर्यंतचा बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी तत्काळ पावलं उचलण्यासाठी भेट घेणार आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT